Saturday, March 31, 2007

लोकल...

सकाळी सुद्धा असंच झालेलं,
८.१४ची लेडिज स्पेशल चुकली,
कारण मी उशीरा पोहोचले,
कारण पिल्लू रडू लागलेलं,
आणि आता बॉस रडत होता,
म्हणून ही दादर-कल्याण ही मुकली...

नशीब माझं, आली लोकल पुढची,
आणि ते ही वेळेवर!
पण देवा रे,ही गर्दी की सर्दी?
वाढतंच चाललीये,थांबतच नाही कुणी...
बायका आहेत की वीरांगणा,
साड्या तर अशा खोचतात कमरेला,
जणू, त्या नाही चढल्या लोकलमध्ये,
तर भारत-चीन मधले संबंध पुन्हा खराब होतील!

कसं बसं आत शिरावं,
तर सीट "क्लेम" करायला,
एक ही "अवेलेबल" नाही,
सगळ्याच उतरणार "लास्ट" स्टॉप ला,
ट्रेन जराशी हल्ली तर,
बसला धकका शेजारच्या गुजरातणीला,
लागली खेकसायला,
माझ्यात भांडण्यासाठीही त्राण नाहीये,
म्हणून मनामनातंच पुटपुटते,
"अगं बाई, गप्प बस,मी स्टॅचु स्टॅचु खेळतेय"

माझी दयनीय अवस्था पाहुन,
चार कॉलेजच्या पोरी एकमेकींत कुजबुजतात,
"वॉट अ बिच"
आता यांना काय गरज तिला शिव्या घालण्याची?
तिला थोडंच कळतंय तुमचं इंग्लिश?

त्यात त्रास वाढवायला,
शेजारचं जेन्ट्स कंपार्टमेन्ट,
त्यांचे भुकेले डोळे पाहून ,
मी लगेच साडीचा पदर सावरते,
आणि कॉलेजच्या त्या मुली,
उगीच स्टाईल मध्ये उभ्या राहतात,
तेवढंच पुरूषांच मनोरंजन!
त्यांच लक्ष असतं,
डब्यातल्या प्रत्येकीकडे,
कुणाचे "असेट्स" किती चांगले ते पाहत,
शरीराची नाही तर निदान डोळ्यांची भूक विझवत...

आणि डब्यातल्या बायका,
त्या माझ्यासारख्याच, स्वतःच्या विश्वात,
सगळं दिसूनही न पाहिल्यासारखं करणार्‍या,
उद्या डब्यात कुठली भाजी?याचा विचार करणार्‍या,
उद्या ८.१४ची लेडिज स्पेशल मिळेल का?
याच्यासाठी प्लॅनींग करणार्‍या!

-प्रेयसी

1 comment:

अरविंद said...

स्नेहा,

खूप छान वर्णन केलेस. लोकलमधे प्रवास करीत असल्यासारखे वाटले.आणि न दिसणा-या मनांचा किती खोल विचार केलास !

व्वा भाची ! खुप आवडली कविता.